Friday, May 6, 2011

गैरसमज

   आम्ही काल संध्याकाळी चालायला गेलो होतो.  घराच्या जवळ एका चौकात आम्ही रस्ता पार करण्यासाठी थांबलो. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना रिकामी जागा आहे. त्यावर हिरवळ उगवली आहे. थोडे पुढे गेले की गिरीशची कंपनी लागते.

   आम्ही त्या रस्त्याच्या कडेने चालत असताना एक मोठा पक्षी वर घिरट्या घालत असलेला आम्हाला दिसला. गरूड का घार का condor (गिधाडाच्या जातितला एक पक्षी) असावा ?   तो हळूहळू घिरट्या घालत खाली उतरू लागला. नक्कीच त्याने काहीतरी हेरले असावे. काही अंतरावर एक चढ असलेली जागा होती. तिथे तो उतरला. आम्ही तिकडे पहिले तर तो जिथे उतरला तिथे जवळच पांढरट राखाडी असे काहीतरी दिसत होते.. ते घरटे असावे का ?  टिटवीचे वगैरे ??  आम्हाला काही क्षणांपूर्वीच त्या रस्त्यावर दोन टिटव्या दिसल्या होत्या. त्यामुळे ती पांढरट राखाडी गोष्ट म्हणजे टिटवीचे घरटे असावे असे आम्हाला वाटले.
    आता तो पक्षी त्या पांढरट गोष्टीत तोंड घालून काहीतरी उचलत होता व खात होता.. नक्कीच पिल्ले !  नक्कीच पक्ष्याची पिल्ले खात होता !!  कुठलाही पक्षी इतकी उघड्यावर कशी पिल्ले ठेवेल असे वाटून गेले.. पण तरीही तो condor का कोण तो, पिल्लांचाच फन्ना उडवत होता असे आम्हाला वाटले.
   लांबूनही त्या condor चे उघडे (पिसे नसलेले ) लालसर डोके दिसत होते. त्या पक्ष्याला उडवून लावावे का असेही वाटले. पण त्याचे आकारमान पाहता हिंमत झाली नाही... शेवटी त्या बळी पडलेल्या पिल्लांबद्दल हळहळत आम्ही घरी गेलो.
   घरी गेल्यावर त्या पक्ष्याबद्दल Internet वर माहिती शोधली. तर साधारण तसे दिसणारे दोन पक्षी आढळले - एक :  California Condor - जी जात खूपच धोक्यात आलेली आहे, व दुसरा : Turkey Vulture..
CaliforniaCondor सारखा जवळपास नामशेष होत चाललेला पक्षी इतक्या सहजपणे दिसणे जरा अशक्य वाटले.. त्यामुळे तो पक्षी Turkey Vulture  असावा असे आम्ही धरून चाललो. त्याचा आहार मुख्यत्त्वे carcasses  म्हणजे मृत प्राणी असतो असे लिहिलेले  होते.
   दुसरे दिवशी आम्ही फिरायला परत बाहेर पडलो. आज त्या जागी जाऊन ती पांढरट राखाडी गोष्ट बघावी असे ठरवले. तिथे जाऊन बघतो तर काय... !  ते घरटे-बिरटे असे काही नव्हतेच !  ती होती पक्ष्याची काळपट - पांढरी अशी पिसे !   बरीच पिसे ..!   आम्हाला दोघांनाही एकदम काय घडले होते याची जाणीव झाली. एक पक्षी मरून पडला असावा व त्याला खायला ते Turkey Vulture खाली उतरले असावे.. बरोबर ! गिधाडे मेलेले पशु-पक्षी खाऊन निसर्गाची जणू स्वच्छताच करत असतात असे पूर्वी वाचलेले आठवले.
   आम्ही उगाचच त्या काल्पनिक पिल्लांविषयी हळहळत त्या गिधाडाला नावे ठेवत होतो  !!

1 Comments:

At May 11, 2011 at 5:15 PM , Blogger प्रसाद मुळे said...

गैरसमज शेवटी गोड झाला तर !! :) मिसळपाववर प्रसिद्ध कर ना !!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home