Wednesday, May 11, 2011

गंध

  आई-बाबांनी मला एक  पुस्तक पाठवले आहे. ते नवेकोरे पुस्तक उघडताच पहिल्यांदा जाणवला तो -- त्याचा गंध !  कोऱ्या पुस्तकाला एक वेगळाच गंध असतो. तो मला आवडतो. शिवाय या पुस्तकाला आणखी एक वेगळाच चंदनी सुगंध आहे. त्यामुळे पुस्तक उघडल्यावर पहिल्यांदा मी भरभरून तो सुगंध घेते..
   
   बरेचसे गंध असे असतात की ज्यांच्याबरोबर काही अनुभव, घटना अथवा भावना जोडलेल्या असतात. तो गंध आला की त्याच्याशी जोडलेली आठवण आपसूक येते.

   घरी काही पूजा, हळदीकुंकू वगैरे असले की आमची आई तिचे खास ठेवणीतले अत्तर काढते -सगळ्यांना लावण्यासाठी. (वाळा, केवडा , मजमूआ असे काहीतरी). त्या अत्तराच्या वासाशिवाय हळदीकुंकू ही कल्पनाच करता येत नाही.
   तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमधले लग्न आणि मोगऱ्याचा सुगंध यांचे पण नाते असेच अतूट आहे.
   आणि परफ्युम्स !  काही लोकांचे परफ्युम्स ही त्यांची ओळख असते. ती व्यक्ती येऊन गेली तरी सुगंध मागे दरवळत राहतो..  शिवाय, नेलपेंट रिमूव्हरचा वास आवडणारेही माझ्यासारखे काही  जण  असतात.
  
   याशिवाय खाद्यपदार्थ !!  बेसन भाजल्याचा, चकल्या तळल्याचा   वास घरोघरी येऊ लागला की समजायचे दिवाळी आली !  दिवाळीच्या आधी ८ दिवस हे खमंग वास आसमंत भरून टाकतात..
   याच्यावरून आठवण झाली.  माझ्या apartment च्या खाली कोणीतरी भारतीय रहायला आले आहेत. रोज
दुपारचे बारा-साडेबारा झाले की काय सांगू ! डोशाचा अस्सा मस्त वास यायला लागतो न त्यांच्याकडून !!  पदार्थांच्या वासांमुळे भारतीय घरे लपून राहणे शक्यच नाही !
   हापूस आंब्यांचा वास हाही एक असाच अद्वितीय वास आहे ! आंब्याचा स्वाद स्वाद जे म्हणतात त्यात चवीएवढाच  वासाचाही अंतर्भाव असतो.

   काहीकाही पदार्थांचे वास मात्र सगळ्यांना आवडतीलच असे नाही.  उदा.-  लोणी कढवल्याचा वास हा काहींना खमंग वाटतो, तर माझ्या नवऱ्यासारखे काही या वासाने नाक मुठीत धरून बाहेर पळतात.  

   फक्त माणसांनाच गंधाचे वेड असते असे नाही.  आमचा कुत्रा पोगो ! मी लाडू करायला घेतले की तो लगेच स्वयंपाकघरात येतो. लाडू वळून होऊन पहिला लाडू त्याला मिळाला की मगच तो तिथून मुक्काम हलवतो.  आहे की नाही मजा ?

   इतके सगळे छान छान वास (आणि छान छान पदार्थ :)  या जगात आहेत, हे आपले भाग्यच आहे.

2 Comments:

At May 11, 2011 at 5:24 PM , Blogger प्रसाद मुळे said...

छान. इथे आल्यावर पहिला महिना विनिता नव्हती, ती येतांना घरुन बरेच काय काय घेउन आली होती. पहिल्या स्वयंपाकात जेव्हा तिने कढीपत्ता वापरला तेव्हा मीच काय आमचे घरही त्या सुवासाने मोहरले होते.

बाय द वे पुस्तक कोणते पाठवले ?

 
At May 11, 2011 at 9:00 PM , Blogger Mangesh said...

छान! :) मागे पुण्यात अवकाळी पाउस झाला तेंव्हा पावसामुळे झालेल्या फजितीपेक्षा आलेल्या मृदगंधाची आठवण झाली एकदम...

Keep it up!! :)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home