Tuesday, May 24, 2011

ही जळमटे कधी निघणार ??

  परवा फेसबुकवर एका महाशयांशी राजकारणाशी संबंधित लेखाचे निमित्त होऊन शाब्दिक चकमक घडली. या महाशयांनी त्यात एक असे विधान केले की,  रा. स्व. संघाची शिकवण ही "impractical" व "outdated" आहे.  या महाशयांना बहुधा संघाचे कार्य व हेतू नीट समजलेले नसावेत. किंवा कदाचित त्यांना हिंदुत्त्वाची allergy असावी.
   हिंदुंचे संघटन, उत्तम व्यक्तिमत्त्व घडण हे काम संघ करतो. स्वतःची संस्कृती जपायला सांगतो, मातृभूमीवर प्रेम व तिचे रक्षण करायला सांगतो... सध्या अनेक जण देशा-विदेशात फिरत असतात. तेव्हा त्यांनी नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की, जगभर असलेल्या धर्मांपैकी हिंदू व बौद्ध-धर्मीय लोक हे वेगाने आपली संस्कृती विसरत आहेत / सोडून देत आहेत. आता अमेरिकेत राहताना लक्षात येते की इथे (मी ऑस्टिन शहरापुरते बोलते) ठिकठिकाणी चर्चेस आहेत, लोक चर्चमध्ये जातात, मुलांना संडे स्कूलमध्ये घालतात - जिथे त्यांना धर्माचे शिक्षण मिळते. ही साईट बघा, म्हणजे संडे स्कूल काय असते याचा अंदाज येईल... http://www.kidssundayschool.com/Gradeschool/Lessons/lessonindex.php
  मुस्लिमांचा धर्माच्या बाबतीतला कट्टरपणा तर आपल्याला माहितच आहे.

  हे इतर धर्मीय असे करतात म्हणून आपण करावे असे नाही.. पण आपल्याला शंभर-दोनशे वर्षांनंतर आपली संस्कृती नष्ट झालेली आवडेल का ? आत्ता Native Americans बाबत बोलतात तसे कदाचित त्या वेळेला एखाद्या वस्तू-संग्रहालयातला गाईड  भगवद् गीतेकडे बोट दाखवून सांगेल की दोनशे वर्षांपूर्वी भारतात हिंदू नावाची जमात होती.. त्यांचा हा धर्मग्रंथ !!   .... असे झालेले चालेल का तुम्हाला ??
  नष्ट व्हायला नको असेल तर त्याची जाणीवपूर्वक जपणूक व्हायला हवी. ते आपोआप जपले जाईल असे सध्याच्या परिस्थितीवरून वाटत नाही.
 
  आता परत परत धर्म व संस्कृती हे शब्द येत आहेत, त्यामुळे त्याविषयी बोलणे आवश्यक आहे.
धर्म म्हणजे a righteous thing to do. धर्म काय करणे योग्य आणि काय अयोग्य याची शिकवण देतो. हिंदू धर्मात काय शिकवण आहे हे माहित करून घायचे असेल तर भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आयुष्यातील प्रत्येक चांगल्या/वाईट प्रसंगी वाटचाल करण्यासाठी गीता मार्गदर्शन करते, असे हिंदुच नव्हे तर इतर धर्मीय अभ्यासकांनीही म्हटले आहे. ( धर्माबद्दल एक चांगले सुभाषित सहज आठवले म्हणून इथे द्यावेसे वाटते :
   धृतिः क्षमा दमोस्तेयं शौचमिंद्रियनिग्रहः
   धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणं
)

आपला धर्म क्षमा करायला सांगतो, कुठेही इतर धर्मांना कमी लेखा, इतरांचे धर्मांतर करा असे सांगत नाही.. पण त्याचबरोबर स्वतःच्या धर्माचे रक्षण हे केलेच पाहिजे.
  
   आता संस्कृतीबद्दल बोलायचे तर त्यात दैनंदिन आचरण, भाषा, वेश, आहार याचा समावेश होतो. नुसत्या भाषेविषयी बोलायला लागले तर अनेक पाने भरतील.
   मला कळत नाही की अनेक सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांना इंग्रजी "फाडणे" मोठे भूषणावह का वाटते ? पुण्यातले उदाहरण द्यायचे तर हॉटेल मध्ये (विशेषतः शहराच्या काही विशिष्ट भागांत ) जेवायला गेल्यावर पदार्थ मागवताना इंग्रजीचा वापर का करायला लागतो ? मराठीत बोलले तर लाज वाटते ? "outdated" वाटते ? मुलांना नुसत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षाही "कॉनव्हेंट " मध्ये घातले तर कॉलर ताठ झाल्यासारखे का वाटते ??  "शुभ दीपावली" पेक्षा "happy diwali" का बरे वाटते ? केकवरची मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरे करता, पण आपल्या मुलांना निदान औक्षण तरी करता का ??  मुलांनी harry potter  वाचलेले अभिमानाने सांगता, पण त्याला फास्टर फेणे वाचायला आणून देता का ?  ग्लोबल किंवा आधुनिक गोष्टी अंगीकारणे म्हणजे स्वतःच्या मातीतल्या गोष्टी सोडून देणे असे होते का ?

   आता कोणी म्हणेल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत..याने आपल्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे.. ? बरोबर आहे.. दैनंदिन आयुष्यात काहीच फरक पडणार नाही.. पण दूरवरचा विचार करू या... ५०-६० वर्षांनी तुमच्या नातवंडांना "औक्षण" हा शब्द शोधायला, पहिल्यांदा मराठी शब्दकोष शोधून आणायला लागेल, व त्यात पाने हुडकून हा शब्द शोधावा लागेल.. !  आता कोणी म्हणेल की बदल तर जगात होतच राहणार.. त्याला काय करणार.. बरोबर आहे, पण गेल्या ५०० वर्षात जेवढे संस्कृतीत, भाषेत  बदल झाले नाहीत तेवढे या १०० वर्षात होतील, इतका जागतिकीकरणाचा रेटा भयानक आहे.. त्यामुळे ते वाचवण्यासाठी आपले प्रयत्नही तेवढेच जास्त सच्चे हवेत !
   (यात मला असे आजिबात म्हणायचे नाही की, इंग्रजी शिकू नये अथवा जेमतेम आली तरी चालेल. ती तर फार उत्तम आलीच पाहिजे.. अजून १-२ परकीय भाषा आल्या तर छानच आहे !  पण मराठी ही आपली प्रथम भाषा आहे, आणि ती जतन होण्याच्या दृष्टीने जिथे शक्य आहे तिथे तिचा पुरेपूर वापर व्हावा असे मला वाटते.)
  
    असेच वेशभूषा आणि आहार याबाबतीतही !   पास्ता / पिझा / sandwich  करायला शिकू या.. पण धिरडी, घावन, थालिपिठे नको विसरू या ... मी अशा काही मुली पाहिल्या आहेत की, ज्यांना परदेशी कामासाठी जायची संधी येते. त्यांना हे दडपण येते की तिथल्या कंपनीत कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत. शर्ट-trouser  अशा प्रकारच्या कपड्यांची त्यांना सवय नसते किंवा आवडत नाहीत. पण भारतीय पोशाख घालून जायचीही लाज वाटते. असे का ? हिंदुंना स्वतःच्या गोष्टींबाबत एवढा न्यूनगंड का ?  (अर्थात, आत्मविश्वास असलेलेही आहेत, पण नसलेलेही बरेच आहेत..)

  असले न्यूनगंड उखडून टाकून हिंदू समाजाला संस्कार, शिस्त, उत्साह व व्यायाम याद्वारे कणखर बनवण्याचे 
काम  संघाच्या शाखा करत आहेत. कुठल्याही जात, पंथ, धर्माच्या लोकांना तिथे निःशुल्क प्रवेश आहे. कोणालाही कमी लेखण्याचे शिक्षण संघ देत नाही, हे मी स्वानुभवावरून व निरिक्षणातून सांगते. शिवाय संघाने कुठलेही आधुनिक शास्त्र/ विद्या शिकण्याला विरोध केलेला नाही..अथवा जुन्या वाईट रूढींना चिकटून राहा असेही सांगितलेले नाही. संघात नियमित जात असलेले अनेक लोक आज विविध कार्यक्षेत्रात, देशा-विदेशात उत्तम तऱ्हेने कार्यरत आहेत. केवळ पांढरपेशा समाजासाठीच नव्हे तर दुर्गम खेड्या-पाड्यातील लोकांसाठी काम करत असलेल्या अनेक संस्थांना संघाचा सक्रिय पाठिंबा आहे, व स्वतःचेही सेवाकार्य (service to society) आहे.
   "impractical" व "outdated" असे हिणवून संघाच्या कार्याची खिल्ली उडवणाऱ्या लोकांच्या मनातील so called आधुनिकतेच्या कल्पनांची जळमटे कधी निघणार, असा मला प्रश्न पडतो !
   मी काही लेखिका नाही किंवा विचारवंतही नाही.. त्यामुळे माझ्या लिखाणात आणि विचारात त्रुटी असण्याची शक्यता आहे. पण माझा मुद्दा योग्य व महत्त्वाचा आहे, आणि मी तो कळकळीने मांडला आहे !
   तुम्ही तो वाचा, विचार करा, आणि पटले तर अंमलात आणा !  आणि नाही पटले तर......
परत एकदा वाचा !!  :-)


  






3 Comments:

At May 24, 2011 at 2:41 PM , Blogger प्रसाद मुळे said...

वाह पल्लवी. लेख अत्यंत आवडला. तळमळीने लिहलेला आहे. सर्वच विचारांशी सहमत आहे, आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या भावना तु उत्तम मांडल्या आहेस. लेख फेसबुकवर शेअर केला आहे. मिसळपाववर आला असता तर उत्तम चर्चा झाली असती.

 
At May 25, 2011 at 6:59 PM , Blogger पुण्याचे पेशवे said...

chan zala ahe lekh. awadala. Bharatiy manasanmadhe ani wisheshtaha marathi lokanmadhe nyoongandacha motha pradurbhav ahe tyachyawar upay kaay yachya shodhat me dekhil ahe.

 
At June 1, 2011 at 10:37 AM , Blogger vasant said...

फार छान आणि अतिशय सडेतोड लेख आहे. उपक्रम.ऑर्ग (http://mr.upakram.org) नावाच्या साइटवर टाकावा. तिथल्या संघद्वेष्ट्या पुरोगामी लोकांना जरुर दाखवण्यासारखा लेख.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home